Palak Paneer Paratha/पालक पनीर पराठा
https://nilamsrecipes.blogspot.com/2023/02/blog-post.html?m=0
पालक पनीर पराठा
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ: २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ वाटी चिरलेला पालक
२) १ वाटी कणिक
३) १/२ वाटी पाणी
४) १/२ छोटा चमचा लाल तिखट
५) चिमूटभर हळद
६) १ छोटा चमचा पांढरे तीळ
७) २छोटे चमचे तेल
८) १/२ वाटी किसलेले पनीर
९) मीठ चवीनुसार
१०) वरून लावण्यासाठी तेल किंवा तूप
कृती:
पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून मिक्सरला लावून घ्यावा.
एका पारादीत मिक्सरला लावलेला पालक, कणिक, थोडी हळद, थोडे लाल तिखट,तीळ, चवीनुसार मीठ घेऊन सर्व एकत्र करावे व पीठ मळून घ्यावे. वरून थोडेसे तेल लावून पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.
दुसऱ्या भांड्यात किसलेले पनीर, उरलेली हळद, लाल तिखट,चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावे.
आता मळलेल्या पिठाचे चपातीसाठी करतो तेवढे गोळे करून घ्यावे.
जेवढे पिठाचे गोळे होतील तेवढे पनीर आधी वेगळे करून घ्यावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्यावी, त्यात पनीरचा एक भाग भरून, पुरी सर्व बाजुंनी बंद करून घ्यावी. छान पोळी लाटून घ्यावी.
तवा गरम करून त्यावर तयार पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यावे.
ठेचा, लोणचे किंवा दह्यासोबत वाढावा.