उकडीचे मोदक - Ukadiche Modak
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/ukadiche-modak.html?m=0
Ukadiche Modak in English
वेळ :
३० मिनिटे
४ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ नारळ
२)किसलेला गुळ
३)२ वाटी तांदुळाचे पिठ
४)वेलचीपूड
५)जायफळ पूड
६)चवीपुरते मिठ
७)उकडीत घालण्यासाठी तेल कींवा तूप
सारण कृती:
नारळ खवून घ्यावा. २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ घ्यावा.
पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे.
गूळ वितळला कि वेलची पूड व जायफळ पूड घालावी. एक चीमुठभर मिठ घालावे व ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
आवरणाची कृती:
तांदूळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी घ्यावे.
जाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे.
गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे. मध्यम आचेवर २ मिनीटे वरती झाकण ठेवून वाफ काढावी.
गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
मोदक बनवण्याची कृती:
एका ताटात तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी.
त्यासाठी बाजूला पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी हाथावर तयार करावी. त्यात सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर हळदीची पान जर मिळाली तर ठेवावीत, त्यावर मोदक ठेवावेत.
वरून झाकण लावून १० मिनीटे वाफ काढावी.
वरून तूप घालून गरमागरम मोदक खावेत.